
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके):पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी व घरफोडीच्या मालिकेचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. महेंद्रनगर, नेपाळ) याला अटक केली आहे. आरोपी येरवडा कारागृहात असताना त्याला ताब्यात घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला.
पोलिसांच्या तपासात आरोपीने दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरासह आसपासच्या भागातून वाहन चोरी आणि घरफोडी केल्याचे समोर आले. त्याच्याकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये यामाहा एफझेड, स्प्लेंडर आणि दोन होंडा शाईन गाड्यांचा समावेश आहे. तसेच एका घरफोडी प्रकरणातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे १.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदकही हस्तगत करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील ४ आणि तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर तसेच अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड व बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेल्या ‘क्राईम मॅपिंग’ व सतर्क पेट्रोलिंगच्या सूचनांमुळे या कारवाईस यश मिळाले.
दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
