
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके):बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, विशेषतः महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिला टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश करत सहा महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ८९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.
एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ समांतर तपास करत होती. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिला टोळी शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी जातेगाव येथे सापळा रचत महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने सहा महिलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराधा ऊर्फ पार्वती मंगेश बुध्दिनाथ (वय ३०), अंजली राम बुध्दिनाथ (वय २१), राधा चरण वैद (वय २१), कल्पना बाला वैद (वय २१), श्वेता उमर वैद (वय २१) आणि जानकी अनिल वैद (वय ३०) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सध्या जातेगाव (शिक्रापूर) येथे राहत असून मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली.
या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडबोले, उपनिरीक्षक सुनील जावळे तसेच अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बो-हाडे, सागर सूर्यवंशी, मनोज साबळे, स्वप्निल महाले व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईमुळे बस प्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
