
पिंपरी-चिंचवड: (प्रतिनिधी देवा भालके) शहरात रिक्षा चोरी करून त्याच वाहनाचा वापर करत जबरी चोरी व मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून १ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाच दिवशी घडलेले तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-३ भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. त्यानुसार भोसरी येथील ‘स्टार झुडिओ’ समोर सापळा रचून हारीश विनोद कदम (वय २०, रा. बिबेवाडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने सहकारनगर परिसरातून रिक्षा (MH 12 SK 4967) चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर हीच रिक्षा वापरून विश्रांतवाडी ते आळंदी रोडदरम्यान एका कारचालकाची वाट अडवून त्याचा सॅमसंग मोबाईल (किंमत सुमारे १० हजार रुपये) जबरीने हिसकावल्याचे उघड झाले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीची रिक्षा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १,०७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या अटकेमुळे भोसरी एमआयडीसी, सहकारनगर आणि दिघी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक सुनील जावळे व त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
