पिंपरी-चिंचवड : छत्तीसगडमधील रायपूर येथे ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या आठव्या नॅशनल थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शौर्य मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या आठ खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. खेळाडूंनी विविध गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत अकॅडमीसह महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.

स्पर्धेत सार्थक उमेश मळेकर, जान्हवी शितल साबळे आणि श्रावणी पपेश राजपूत यांनी सुवर्णपदक पटकावले. आर्यन नागेश शेंडगे याने सुवर्णपदकासह कांस्यपदकाची कमाई केली. हरिश सेंथिल कुमार आणि सोनम शितल साबळे यांनी रौप्यपदक, तर निधी कृष्णा भोसले हिने दोन कांस्यपदके पटकावली. विवेक नितीन जाधव यानेही कांस्यपदक मिळवले.
या सर्व खेळाडूंना शितल साबळे, प्रशांत साबळे आणि कार्तिक क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, खेळाडूंचा कठोर सराव आणि मेहनतीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली.
खेळाडूंच्या या यशाबद्दल इंडिया थाय बॉक्सिंगचे अध्यक्ष पी. वाय. अत्तार, नाझीम शेख, वजीर शेख, आमीन अत्तार, प्रियंका मॅडम, कोल्हापूरचे अध्यक्ष विशाल माळी आणि अजय सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान छत्तीसगड थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शौर्य मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या पदकविजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.
या यशामुळे शौर्य मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अकॅडमीतील इतर खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

