पिंपरी, दि. ७ जुलै २०२६ (प्रतिनिधी): पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड परिसरात मंगळवारी (दि. ७) दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या डी.पी. बॉक्सला करंट आल्याने एका मुक्या गाईचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश मंदिराजवळ, किर्ती हॉस्पिटल शेजारी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, डी.पी. बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युतप्रवाह असल्यामुळे गाय त्याच्या संपर्कात येताच ती जोरदार झटका बसून सुमारे पाच फूट अंतरावर फेकली गेली. गंभीर विद्युत धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वी १२ मे २०२५ रोजी पिंपरी गावातील वैभवनगर परिसरात अशाच प्रकारे महावितरणच्या डी.पी. बॉक्सचा करंट लागून एका गाईचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक अभियंता वैभव देशमुख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू असून अद्याप न्याय मिळालेला नाही.
कुदळे यांनी आरोप केला की, एका घटनेतून धडा न घेतल्याने पुन्हा त्याच प्रकारची दुर्घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या डी.पी. बॉक्सची योग्य देखभाल, सुरक्षितता आणि नियमित तपासणी करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरल्यामुळे निष्पाप मुक्या जनावराचा बळी गेला आहे.
या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा धोकादायक डी.पी. बॉक्सची त्वरित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“वैभवनगर प्रकरण आणि किर्ती हॉस्पिटलजवळील मुक्या गाईच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत,” असा इशाराही सुहास कुदळे यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उघड्या किंवा धोकादायक विद्युत यंत्रणांमुळे नागरिकांसह मुक्या प्राण्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी महावितरणने तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

