पुणे | प्रतिनिधी देवा भालके
पुणे शहरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन २१ वर्षीय तरुणीवर चार जणांनी मिळून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही विमाननगर परिसरात राहणारी असून, २०२५ मध्ये तिने पुण्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच दरम्यान तिची फरान शेख याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले; मात्र आरोपीने या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच, आरोपीने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे तिला सतत ब्लॅकमेल करण्यात आले आणि विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या मानसिक छळाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडसाने वाघोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल या चार आरोपींना अटक केली.
या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, डिजिटल पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.

