पिंपरी, प्रतिनिधी : देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पालगतच्या सुमारे १६ एकर जागेत शहरातील दैनंदिन कचरा साठविण्याचा प्रस्ताव तात्काळ स्थगित करावा आणि पुनावळे येथील सुमारे ८० एकर जागेसह अन्य पर्यायी ठिकाणांचा वैज्ञानिक निकषांवर विचार करावा, अशी ठाम मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मोशी कचरा डेपो येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण कचरा व्यवस्थापन प्रणाली, पर्यावरणीय सुरक्षितता आणि प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत त्याच परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर कचरा साठविण्याचा प्रस्ताव हा पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरेल.जुलै २०२६ मधील सर्वसाधारण सभेतही या प्रस्तावाला विरोध नोंदविल्याची आठवण करून देत, नगररचना व पर्यावरण विभागाकडून संपूर्ण वस्तुस्थिती समोर ठेवली जात नसल्याचा संशय असल्याने स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत वस्तुनिष्ठ पाहणी करूनच अंतिम निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.प्रस्तावित जागेवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठविल्यास लिचेटमुळे भूजल प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोशी परिसरातील विहिरी, बोअरवेल, पाणवठे आणि भूजलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हायड्रोजियोलॉजिकल अभ्यास, भूजल गुणवत्तेची वैज्ञानिक तपासणी आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.मोशी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून दुर्गंधी, वायू प्रदूषण, लिचेट, भूजल प्रदूषण, डासांचा प्रादुर्भाव, वाहतूक कोंडी आणि विविध आरोग्य समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच परिसरावर शहराचा कचरा टाकण्याचा भार टाकणे हे पर्यावरणीय न्यायाच्या तत्त्वालाच विरोध करणारे असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले.निवेदनात भारतीय राज्यघटनेतील कलम २१, ४८-अ आणि ५१-अ(ग) यांचा उल्लेख करत नागरिकांच्या स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरणातील जीवनाच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम, राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांच्या निर्देशांचे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन झाल्याशिवाय कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, अशी मागणीही करण्यात आली.यासोबतच देहू रोड, कासारवाडी येथील कलासागर हॉटेलजवळील जागा तसेच पुनावळे येथील सुमारे ८० एकर जागा यांसारख्या पर्यायी ठिकाणांचा वैज्ञानिक निकषांवर विचार करून शहरासाठी विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाचा नवीन आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.मोशी कचरा डेपोमधील बायोमायनिंग, वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, खाण भरणे, टीडीआर व्यवहार आणि संबंधित पर्यावरणीय बाबींची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्याची मागणीही वाघेरे यांनी केली आहे.प्रशासनाने मोशीकरांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी तडजोड करणारा निर्णय घेतल्यास भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी, NGT च्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संदीप वाघेरे यांनी दिला.

