पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी देवा भालके
मोशी कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा ढिग शेजारील इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन सादर करून दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची तसेच पर्यावरण विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे मोठे ढिग साचल्यामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढत गेले असून, बायोमायनिंगच्या विविध टप्प्यांसाठी शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही अपेक्षित परिणाम दिसून आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, पर्यावरण विभागात केवळ निविदा प्रक्रिया आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर भर दिला जात असून, विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.
याशिवाय मोशी कचरा डेपोमध्ये यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प बंद पडले असून, त्यामुळे महानगरपालिकेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत पर्यावरण मंत्री Pankaja Munde यांनाही पाठविण्यात आली आहे.
टीप: या बातमीतील आरोप नगरसेविका सुलभा उबाळे यांनी त्यांच्या निवेदनात केलेले असून, त्याबाबत संबंधित अधिकारी किंवा महानगरपालिकेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

