पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी देवा भालके
मोशी कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा ढिग शेजारील इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची तसेच संपूर्ण विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उबाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मोशी कचरा डेपोमध्ये वाढलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद असल्याने कचऱ्याचे डोंगर वाढत गेले असून, बायोमायनिंगच्या विविध टप्प्यांसाठी शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही अपेक्षित परिणाम दिसून आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात पर्यावरण विभागात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या विभागाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मोशी कचरा डेपोमध्ये राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प बंद पडल्याने महानगरपालिकेच्या हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनाही पाठविण्यात आली आहे.
टीप : या बातमीतील सर्व आरोप नगरसेविका सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील आहेत. या आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

