पिंपरी-चिंचवड, दि. ९ जुलै २०२६ : देवा भालके पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत असलेली एक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अंदाजे १९ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच भारतीय नौदल आणि भारतीय सैन्याचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
दुपारची वेळ असल्याने काही कर्मचारी जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी इमारत अचानक कोसळली आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. ढिगाऱ्याखालून मदतीसाठी येणाऱ्या हाका, बाहेर चिंताग्रस्त अवस्थेत उभे असलेले नातेवाईक आणि जीवाची पर्वा न करता सुरू असलेले बचावकार्य असे अत्यंत हृदयद्रावक चित्र घटनास्थळी पाहायला मिळाले.
आतापर्यंत आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित नागरिकांचा शोध सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
या संकटाच्या क्षणी प्रत्येक अडकलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत एकच आशा होती—आपले माणूस सुखरूप बाहेर यावे. त्या कुटुंबीयांसाठी घटनास्थळी जीव धोक्यात घालून काम करणारे अग्निशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक, भारतीय नौदल आणि भारतीय सैन्याचे जवान हेच जणू देवदूत ठरले.
“देव शोधावा कुठे?” या प्रश्नाचे उत्तर आज मोशीतील या दुर्घटनेत दिसले. संकटात धावून येऊन दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या सर्व बचाव पथकातील अधिकारी आणि जवानांमध्येच मानवतेचा खरा देव दिसून आला.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

