पिंपरी, प्रतिनिधी : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील तुलनेने नव्या इमारतीचे कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे बांधकामाचा दर्जा, संरचनात्मक रचना (डिझाईन), गुणवत्ता नियंत्रण, देखरेख आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व तांत्रिक चौकशी करून बांधकामातील निकृष्ट दर्जा, संरचनात्मक त्रुटी, निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित बिल्डर, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल (RCC) डिझायनर, स्ट्रक्चरल प्रूफ चेकर, अभियंते, पर्यवेक्षक आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लागू कायद्यांनुसार सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेने दुर्घटनाग्रस्त इमारतीचे स्वतंत्र शासकीय तज्ज्ञ समितीकडून स्ट्रक्चरल ऑडिट व फॉरेन्सिक तपासणी, मंजूर नकाशे व गुणवत्ता चाचणी अहवालांची पडताळणी, दोषींवर फौजदारी व विभागीय कारवाई तसेच संपूर्ण चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी केली आहे.
“नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही केवळ दुर्घटना नसून, जर निष्काळजीपणा किंवा निकृष्ट बांधकामामुळे ही घटना घडली असल्याचे चौकशीत सिद्ध झाले, तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,” असे गुलाब पानपाटील यांनी निवेदनात नमूद केले

