पिंपरीचिंचवड प्रतिनिधी: देवा भालके दि. ३ : शहरातील स्मशानभूमी, शवदाहिनी तसेच विद्युत दाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांकडून केली जात नसल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश ठेकेदार शहरात उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधणेही कठीण होत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना महापालिका अधिकारी पाठीशी का घालत आहेत, असा सवाल माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी उपस्थित केला.
बुधवारी (दि. २) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक १५ मधील विविध समस्यांचा पाढा वाचताना मोरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. विद्युत दाहिनीशी संबंधित किरकोळ तक्रारी मांडण्यासाठी सर्वसाधारण सभेची परवानगी कशासाठी हवी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“गेल्या पाच महिन्यांपासून नागरिकांच्या समस्या प्रशासनाकडे मांडून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही संबंधित कामे झालेली नाहीत. संबंधित ठेकेदार कोण आहे, याची माहितीही अधिकारी देत नाहीत. आम्ही सुचविलेली कामे ठेकेदारांकडून केली जात नसतील, तर महापालिका प्रशासनाचा ठेकेदारांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. मग अशा ठेकेदारांना अधिकारी का पाठीशी घालत आहेत?” असा सवाल मोरे यांनी केला.
प्रभाग क्रमांक १५ मधील उद्यानांच्या दुरवस्थेचाही मुद्दा त्यांनी सभेत उपस्थित केला. उद्यानांमधील खेळणी मोडली असून झाडांची नासधूस झाली आहे. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत, तर नागरिकांसाठी ठेवण्यात आलेली बाकडीही मोडली आहेत. या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. संबंधित कामांबाबत विचारणा केल्यानंतर अधिकारी ‘बजेट नाही’ असे कारण देतात. किती दिवस हेच कारण सांगितले जाणार? उद्यानांच्या देखभालीसाठी आवश्यक निधीची तरतूद का केली जात नाही, याचा उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी मोरे यांनी केली.
बजेटअभावी कामे रखडली : अधिकारी
मोरे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले की, शहरातील सर्व उद्यानांमध्ये खेळणी बसविण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बजेटअभावी उद्यानांमधील आवश्यक कामे करता येत नसल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले.
‘बजेट नाही’चे कारण आता चालणार नाही
यावर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. “बजेट नाही, हे नेहमीचेच उत्तर झाले आहे. असे चालणार नाही. शहरात सुरू असलेल्या तसेच आगामी विकासकामांना वेग देण्यासाठी प्रशासनाने आपली कार्यपद्धती तातडीने सुधारावी. अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे करणे आता पूर्णपणे बंद करावे,” अशी स्पष्ट ताकीद बारणे यांनी दिली.
प्रलंबित निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच यापुढे कोणत्याही कामाला विनाकारण अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे बारणे यांनी सभेत स्पष्ट केले.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
ठेकेदारांना पाठीशी का घालता?; माजी उपमहापौर शैलजा मोरेंचा प्रशासनाला सवाल विद्युत दाहिनीपासून उद्यानांच्या दुरवस्थेपर्यंत नागरिकांच्या समस्यांवर सर्वसाधारण सभेत संताप
Related Posts
Add A Comment

