पिंपरीगाव : श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) पिंपरीगाव येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चेंबूर येथील शितळादेवी गोविंदा पथकाने तब्बल सहा थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सोहळ्यास परिसरातील हजारो नागरिक, तरुणाई आणि विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. गोविंदांच्या घोषणांनी आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण पिंपरीगाव परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आयोजक संदीप वाघेरे, सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, विकास साने, विराज लांडे, भीमाताई फुगे, निकिता कदम, प्रियांका कुदळे, मीनाताई नाणेकर, श्रीरंग शिंदे, ज्ञानोबा गव्हाणे, सुधाकरजी यादव, वसंत तावरे, रामभाऊ कुदळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सिनेअभिनेत्रींच्या उपस्थितीने रंगत वाढली
दहीहंडी उत्सवासाठी सिनेअभिनेत्री राशी खन्ना, महिमा मकवाना, नेहा सोनवणे आणि रुचिता जामदार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. अभिनेत्रींच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमादरम्यान गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांनी दाद दिली. शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा उभारून दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
पोलिस प्रशासनाचे सहकार्य; उत्सव शिस्तबद्ध वातावरणात
मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभले. आयोजकांकडून आवश्यक शासकीय नियम व सुरक्षा सूचनांचे पालन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण उत्सव उत्साहपूर्ण तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित या दहीहंडी उत्सवामुळे पिंपरीगावातील पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवाला विशेष रंगत आली. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव आणि नीतू भाटिया यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, नितीन गव्हाणे, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, राघवेंद्र भांडगे, अक्षय नाणेकर, राजेंद्र वाघेरे आणि गणेश मंजाळ यांनी केले.

