पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी देवा भालके
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव अर्थात ‘SKY’ याच्या पुनरागमनाबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असतानाच त्याने स्वतःच ‘टीम इंडिया’मध्ये पुन्हा Comeback करण्याचा विश्वास व्यक्त केला. भोसरी येथे आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवात उपस्थित हजारो चाहत्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले. त्याच्या या वक्तव्याने उपस्थित क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकुमार यादवला निमंत्रित करण्यात आले होते.
सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड, विशेषतः भोसरीत दाखल झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमस्थळी त्याचे आगमन होताच हजारो चाहत्यांनी ‘SKY… SKY… SKY…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांचा गजर आणि दहीहंडीचा उत्साह यामुळे कार्यक्रमस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
‘ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी’
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा योग आल्याचे सांगत सूर्यकुमार यादवने पुणे-पिंपरी-चिंचवड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असल्याचे म्हटले.
मुंबईहून पिंपरी-चिंचवडपर्यंतचा प्रवास पावसाळी वातावरणातही जलद आणि सुखकर झाल्याचे सांगताना त्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचाही उल्लेख केला. तसेच आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचे त्याने कौतुक केले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या महेश लांडगे यांचे आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचे सूर्यकुमार यादवने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य असल्याचेही त्याने नमूद केले.
‘देशासाठी खेळायचं आणि जिंकायचं’
यावेळी सूर्यकुमार यादवने देशातील युवा खेळाडूंना प्रेरणादायी संदेश दिला. क्रिकेटसोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय युवा खेळाडू चांगली कामगिरी करत असून, ऑलिम्पिक, एशियाड आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावत आहेत, असे त्याने सांगितले.
‘देशासाठी आपल्याला खेळायचंय आणि जिंकायचंय’, ही जिद्द प्रत्येक खेळाडूने मनात ठेवून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असा संदेश त्याने दिला.
भारतातील सण, उत्सव आणि परंपरांचे प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी अतूट नाते आहे. देशात असो किंवा परदेशात, कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. आपले सण, उत्सव आणि परंपरा हीच भारताची अस्मिता असल्याचेही सूर्यकुमार यादवने सांगितले.
‘SKYसारखे खेळाडू देशाचे रिअल हिरो’
आमदार महेश लांडगे म्हणाले, “देशाचे नाव जगभरात उंचावणारा खेळाडू कुस्ती आणि कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या पैलवानांच्या भोसरी नगरीत आला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू हे खऱ्या अर्थाने देशाचे ‘रिअल हिरो’ आहेत. आपल्या खेळाच्या माध्यमातून त्याने देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्याचे भोसरीत स्वागत करणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

