पिंपरी-चिंचवड प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी | प्रतिनिधी देवा भालके 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डब्बू आसवाणी, संदीप बाळकृष्ण वाघेरे, प्रियांका सुनील कुदळे व निकिता कदम या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती.
प्रभागातील प्रमुख रस्ते, चौक आणि वसाहतीतून ही बाईक रॅली मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. चौका-चौकात करण्यात आलेल्या जंगी स्वागतामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी आणि पक्षाच्या घोषणा देत रॅलीने संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.
या बाईक रॅलीत तरुण-तरुणींसह महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
रॅलीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. “प्रभाग क्रमांक २१ चा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा परिवर्तनाचा संदेश देणारा आहे,” असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.
या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे वातावरण अधिक बळकट झाल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.