सोसायट्यांमधील मतदारांचा संदीप वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनलला मोठा प्रतिसाद व पाठिंबा

पिंपरी, दि. ०५ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी):
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोसायट्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी पॅनलला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पॅनलचा प्रचार सध्या जोरात सुरू असून प्रचार फेरी, पदयात्रा, घरोघरी संपर्क तसेच सोसायट्यांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यात येत आहे.

पिंपरी गावातील यशदा फ्लोरेन्झा सोसायटी, सुखवानी सोसायटी, सुखवानी कॅसल आणि सुखवानी सिटी येथील सोसायटीधारकांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
या वेळी पूर्व पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, राकेश मोरे, राजेंद्र वाघेरे, नितीन गव्हाणे, शेखर अहिरराव, दत्ता बोराडे, ईश्वर कुदळे, श्रीचंद नागराणी, मोटवानी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, “यावेळी मतदारांमध्ये परिवर्तनाची स्पष्ट लाट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकताच पिंपरी-चिंचवडचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी २०१७ नंतर सत्तेवर असलेल्या भाजपवर जोरदार टीका करत हप्तेखोरी, टेंडरमधील रिंग आणि पालिकेला कर्जबाजारी करण्याचे आरोप केले. भाजपच्या सत्तेच्या मस्तीला या निवडणुकीत उतरवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “पिंपरी गाव प्रभागात नगरसेवक म्हणून केलेली भरीव विकासकामे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंबीर नेतृत्व यामुळे प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल निश्चितपणे विजयी होईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.